कितीही नको म्हंटले तरी आठवणी पुन्हा समोर येतातच. डोक्यात चाललेलं सगळ बाहेर काढून पुन्हा आपला प्रस्थ आत अस काही मांडतात की आठवणींची आणि डोक्यातल्या जागेची इंटरसेक्शन घेतली तरी ती त्या दोघांच्याही युनियन इतकीच भरते आणि ते होवून ही अजून मन सुद्धा गच्च भरलेले असते. आजही तसेच झाले. अगदीच अचानक, त्याला आज तिची आठवण झाली. मागे पुढे काहीच संदर्भ नसतांना. दिवसभर बड-बड करून थकलेला तो सायंकाळी अचानकच शांत झाला. लोकांच्या गर्दीतून दूर जाऊन बसला, विचार करत. जोरात निश्वास सोडत. पुन्हा विचार करत. अस खूप वेळ चालू होत. चेहरा अगदीच मलूल. कुणी बघितल तर, रडेल हा अचानक, असच म्हणेल. त्याच्या डोळ्या समोरून ती सगळी सरकत होती अगदी चित्रपटाच्या फिल्म सारखी एका एका क्षणाने. ती हसतांना. ती रुसतांना. ती लाडात आलेली असतांना. सगळे हाव-भाव तिचे अगदी स्पष्ट आणि मोठ्या रेसोल्युशन मध्ये समोर येत होते. तो अगदी विसरलाच होता तिला. पण मग हे काय अचानक? कारण एखादा माणूस कुणाला अगदीच विसरला असेल तर आठवून आठवून ही त्या व्यक्तीचा चेहरा त्याला निट आठवत नसतो. पण मग इथे तर अगदी डोळ्यासमोर प्रत्येक क्षणाचा पिक्झेल न पिक्झेल स्पष्ट दिसत होता. ती नाराज झाली की तिच्या डोळ्याखाली जमा झालेल्या सुरकुत्या. तिचा तेंव्हाचा तो बारीक झालेला रडका चेहरा. अस वाटायचकी ही रडेलच आता. आणि मग तिचं हे असं झाल की घाबरलेला हा. साल्याला धाडस करून अशा क्षणाला तिला मिठीत कधी घेताच नाही आल. कदाचित याच क्षणी तिला त्याची खरी गरज असायची. तिच्या शब्दात हा म्हणजे निव्वळ घाबरट. तीचे हसतांना दिसणारे पांढरे शुभ्र दात, अगदी तिच्या सावळ्या चेहऱ्यात उजळून दिसायचे. पण त्या शुभ्रतेला साजेशी किंवा वरचढ अशी सावळेपणाची कांती तिच्या चेहऱ्याला उजळून टाकायची. तिच्या जास्त जवळ गेले की घाबरवून टाकणारी स्वतःच्या छातीतली धडधड आणि तिचे त्याच्याकडे कोपऱ्यातून बघणारे डोळे. सगळ सगळ खूप खूप स्पष्ट आठवत होता त्याला. इतकी की कदाचित हे सगळे क्षण आताच घडतायेत. कदाचित प्रेम खूप दृढ असले आणि विरहही तितकाच यातना देणारा असेल तर हे सगळ असच होत असणार. पण, मागे वळून पहिले तर ती दोघेही समजून उमजून एकमेकांच्या दूर गेली होती. अगदी इतकी दूर की भेटण्याची सहज शक्यता असूनही गेली काही वर्षे कधीच एकमेकाच्या नजरेला सुद्धा पडली नाहीत. इतका निश्चय मनाचा. पण आज हे काय, तिला जाऊन भेटावे की काय, असे विचार मनात. तिला भेटाव, तिच्या कुशीत जाऊन रड रड धो धो रडावं अशी प्रबळ इच्छा त्याची आज. तिच्या कुशीत जाऊन रडायला त्याला विरहा इतका मोठ्ठ कारण असतांना इतर कोणत्याच करणाची गरजही नाही. पण हे सगळच विचारात. येथेच. त्याच्या जवळ. ती मात्र तिकडे असाच विचार करत बिछान्यात रडून रडून थकून आत्ताच झोपलेली. इतकी अत्ता की, अजूनही उशीवारचे अश्रुंचे थेंब विरलेले नव्हते. सायंकाळ कधीच सरून गेलेली. याला मात्र आजून ही भान नाही. तो तसाच बसून आहे. रडेल थोड्या वेळाने!
- प्र. बा.
- प्र. बा.
Comments