खूप पावसाळे गेले. पण अगदी अलीकडे पर्यंत त्याला पाऊस कधीच आवडलेला नव्हता. पाऊस म्हंटल की त्याला भीती वाटायची, नसती कट कट वाटायची. भिजणे तर त्याला कधीच नको वाटायचे, उगाच सर्दी ला आमंत्रण. पण मागच्या पवसाळ्यात ढग असे आले आणि पाऊस इतका पडला की तो पावसाच्या प्रेमातच पडला. पाऊस आधीही पडायचा, कदाचित असाच, इतकाच किंवा जास्त ही. पण या वेळेस मात्र पाऊस एकटा आला नाही, त्याच्या आयुष्यात सोबत घेऊन आला तिच्या केसांचा ओला सुगंध. ती अशीच त्याला भेटली, अगदी अचानक आलेल्या मुंबईतल्या पावसासारखी, चिंब भिजलेली. त्याला ती आवडली आणि म्हणून पाऊस ही. ती त्याला पुन्हा भेटली, न ठरवून, अशीच पुन्हा एकदा अचानक पावसाराखीच. ते बोलले, थांबले, विसावले. ती समोर आली तेंव्हा पाऊस नव्हताच, ती अजून थोडी जवळ आली तेंव्हा ही पाऊस नव्हता. तो तिच्याकडे सारखा पहातच होता, पण नजर चोरून. आयुष्यात पहिल्यांदा त्याने पावसाकडे येण्याची विनवणी केली. आशेच्या नजरेने त्याने ढगांकडे पाहिले. ढग होते, पण अजून पाऊस मात्र नव्हता. तरी ही आजूबाजूंच्या झाडात, डोंगरात, फुलात आणि पाखरात ओलावा होताच. त्याच्या विनवनीने अखेर तो आला. रिम-झिम, रिम-झिम...
Comments