एका उंच इमारतीत जिथे खिडकीतून समुद्र दिसतो तिथे त्याची मीटिंग चालू असते. जून-जुलै असावा. बाहेरचं त्या काचेच्या बंद इमारतीत काहीच ऐकू येत नाहीये. तो बराच वेळ खूप काही बोलतो. बाकीचे माना हलवत असतात. काही जण त्याला खोडतात, काही जण 'खरं आहे' असा दुजोरा देतात. आता मीटिंग मधली मुख्य लढाई संपलेली आहे. मग कुणी काय आणि कुणी काय मांडतोय. मिटिंगचे मुद्दे संपल्यावर ही मीटिंग चालू राहतात हा मीटिंग रुमांमधला वास्तुदोष असावा. असो. त्याचं लक्ष मोबाईल मध्ये शाळेच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर जातं. तोवर खिडकी बाहेर पाऊस सुरू झालेला असतो. ऐकू येत नाही, पण दिसतो. समुद्र ही त्याच्या त्याच तालात. ग्रुपवर कुणीतरी लक्षात न येणाऱ्या मित्राने त्यांच्या दहावीच्या निरोप समारंभाचा फोटो टाकलेला. सगळ्यांचे त्यावर खूप थम्सअप आणि रिप्लाय. हा फोटो अगदी 20 वर्षे आधीचा. फार लोकांकडे हा नव्हता. त्याकाळी प्रिंट घ्यायची असेल तर 20 रुपये लागायचे. अर्थातच अनेकांना ते परवडणारं नव्हतं. याच्याकडे होता. पण हा फक्त कधी कधी घर बदलतांना, किंवा समान नीट लवतांनाच तो बघायचा. अशा वेळी मग दोन तीन दिवस सगळ्या आठवणी उमाळून ...